पेट्रोल पंप चालकांची 'सांजवार्ता'ने केली पोल-खोल, पुरवठा विभागाच्या तपासणीत अनेक गैरप्रकार होणार उघड

Foto

औरंगाबाद - शहरातील पेट्रोल पंपचालकांनी मनमानी करीत ग्राहकांना लुबाडणे सुरू केले असून असाच एक प्रकार हर्सूल टी पॉइंट येथील पेट्रोल पंपाबाबत उघडकीस आणत 'सांजवार्ता'ने पेट्रोल पंप चालकांच्या गैरकारभारावर प्रकाश टाकला होता. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली असून अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


शहरातील पेट्रोल पंपाबाबत असंख्य तक्रारी येत होत्या. भाव फलक अपडेट न करणे, तारीख अपडेट न करणे, कमी पेट्रोल देणे यासह अनेक तक्रारी पुरवठा विभागाकडे आल्या होत्या. हर्सूल टी पॉईंट वरील पेट्रोल पंपावर एका ग्राहकाला जुन्या तारखेची पावती दिल्याने वाद निर्माण झाला होता. सदर ग्राहकाने याबाबत व्हिडिओ शूटिंग करून  'सांजवार्ता' प्रतिनिधीला पाठवला. या तक्रारीची दखल घेत सांजवार्ता प्रतिनिधीने जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार आता पुरवठा विभागाने सदर पेट्रोल पंप चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर शहरातील इतरही काही पेट्रोल पंप बाबत तक्रारी आहेत. त्यांचीही चौकशी करण्यात  येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.

 

ऐतिहासिक वास्तू जवळील पेट्रोल पंप कधी करणार बंद 

शहरातील अनेक पेट्रोल पंप भरवस्तीत सुरू आहेत. अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या या पेट्रोल पंपावर कारवाई करावी अशी मागणी अनेक स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा स्थळाजवळील पेट्रोल पंपावर ही कारवाई करावी अशी मागणी होत आहे. यात दिल्ली गेट येथील पेट्रोल पंप, शहागंज मधील भरवस्तीतील दोन्ही पेट्रोल पंप हे  पेट्रोल पंप तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे. याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क केला असता या पंपाविरुद्ध आलेल्या तक्रारीवर निश्चित कारवाई करू, असे आश्वासन पुरवठा विभागाने दिले.